
शिक्षण हा विषय सर्वांच्याच जिव्हाळ्याचा. भावी पिढीची जडणघडण जिथे सुरू होते ते ज्ञानमंदिर म्हणजे शाळा. प्राथमिक असो वा माध्यमिक, शाळा "चांगली' पाहिजे असा आपला आग्रह असतो. शाळेची इमारत यासारख्या मुद्द्यापासून शाळेतील शिक्षक, वातावरण, उपक्रम अशा अनेक बाबींचा त्यात समावेश होतो. अगदी शाळेला मैदान आहे की नाही इथपर्यंत.राजधानीच्या पणजी शहराचे उदाहरण घेतले तर या आघाडीवर फारच निराशाजनक चित्र दिसते. पणजी शहरात आणि आसपासच्या भागांत प्राथमिक आणि माध्यमिक मिळून जेवढ्या शाळा आहेत, त्यातील किती शाळांच्या अद्ययावत इमारती आहेत, किती शाळांना मैदाने आहेत, किती शाळांतील मुलांसाठी येण्याजाण्याची चांगली सुविधा आहे या प्रश्नांवर विचार सुरू केला तर भयावह चित्र नजरेसमोर उभे राहते. अपुऱ्या जागेत, कशाबशा खोल्यांमध्ये मुलांचे शिक्षण सुरू असते. पालक कसेबसे त्यांना आणून सोडतात, शाळा सुटल्यावर घरी घेऊन जातात. स्कूलबस अथवा टॅक्सी-रिक्षा असली तरी या व्यवस्थेतही अडचणी असतात. मुलांच्या मानसिक आणि शैक्षणिक जडणघडणीशी हे विषय थेट संबंधित आहेत.या विषयांवर मोकळ्या वातावरणात चर्चा झाली तर काहीतरी ठोस निष्पन्न होऊ शकेल. आपल्या मुलांचे आयुष्य चांगले घडण्यात हातभार लागू शकेल. अशा विचारानेच आम्ही हा विषय "गोमन्तक टुडे, ओपन फोरम'मध्ये चर्चेसाठी घेण्याचे ठरविले आहे. "गोमन्तक टुडे'चा साप्ताहिक ओपन फोरम गेले वर्षभर अथकपणे सुरू राहिला. यापुढेही ते वाचकांसाठी खुले आहेच, फक्त वेगळ्या स्वरूपात आणि नव्या दिमाखात. नव्या वर्षात दर महिन्यातून एकदा हा फोरम भरेल. नव्या स्वरुपातील पहिल्या फोरमचा विषय मुलांच्या जडणघडणीशी संबंधित असला तर उत्तम. याद्वारे एका चांगल्या समाजाच्या उभारणीस हातभार लावता येईल आणि "गोमन्तक'चे समाजाशी असलेले जुने नाते अधिक दृढ करता येईल अशा विचारातून हा विषय आम्ही येत्या रविवारच्या फोरमसाठी घेत आहोत.हो, यावेळचा ओपन फोरम रविवारी सकाळी असेल. पणजी आणि आसपासच्या भागांतील गर्दीत सापडलेल्या शाळा शहराबाहेर विस्तृत ठिकाणी हलवायच्या असा प्रस्ताव घेऊन आम्ही हा फोरम भरवत आहोत. बांबोळी अथवा रायबंदर किंवा दोनापॉल यासारख्या जवळपासच्या एखाद्या ठिकाणी या सर्व शाळा हलवाव्यात. तिथे मोकळी हवा असेल, मोठी मैदाने असतील, वाहतुकीचा गोंगाट नसेल. प्रत्येक भागातून ठराविक वेळेला मुलांची ने-आण करण्यासाठी स्कूल बसेस असतील. आपण थोडा विचार केला तर लक्षात येईल की मुलांच्या आणि पालकांच्याही दृष्टीने ही व्यवस्था खूप चांगली तसेच सोयीची बनू शकते.मध्यंतरी मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्यांनी अशा प्रकारच्या प्रस्तावाचे सूतोवाच केले होते. विद्यार्थी आणि पालकांची सोय होण्याबरोबरच पणजीतील वाहतुकीची कोंडीही कमी होऊ शकते असा हा प्रस्ताव आहे. गरज आहे व्यापक स्तरावर विचार करण्याची. यापुढे पणजीतील गर्दी-गोंगाट वाढतच जाणार आहे. मुळातच मोकळ्या जागा फारशा उरलेल्या नाहीत, त्यावरही आक्रमण होत जाणार आहे. दर दिवशी मुलांना शाळेपर्यंत ने अन सोडायचे आणि परत आणायचे यापेक्षा पालक घराच्या जवळून जाणाऱ्या स्कूलबसमधून मुलांना पाठवू शकतील. मुलांना मोकळा श्वास घेत आणि काही वेळ मैदानावर खेळत शिक्षणाचा आनंद लुटता येईल.अशा अनेक बाबी या विषयाअंतर्गत येतात. प्रश्न आपण नव्या परिस्थितीशी अनुरूप असा मार्ग स्वीकारण्याचा आहे. त्यामुळे या विषयाची सुरवात चर्चेने करूया, गोमन्तक टुडे ओपन फोरममध्ये सहभागी होऊन. हा फोरम सर्वांसाठी खुला असतो, हे वेगळे सांगायची गरज नाहीच.

5 comments:
या विषयांवर मोकळ्या वातावरणात चर्चा झाली तर काहीतरी ठोस निष्पन्न होऊ शकेल. आपल्या मुलांचे आयुष्य चांगले घडण्यात हातभार लागू शकेल
मला वाटतं की आजचं जग हे ज्ञानावर चालणारं आहे. पणजीत कला अकादमी असल्याने तिथे अनेक जागतिक दर्जाचे कार्यक्रम होतात. एक शैक्षणिक संकुल असल्यामुळे एकूणच शिक्षणक्षेत्रातील नवे ट्रेंड माहिती करून घेण्यासाठी चालना मिळेल. तसेच पणजी हे राजधानीचे शहर असल्याने पणजीत शिक्षण संकुल उभारल्यास सामान्य नागरिकांसाठी ते सुलभ ठरेल.
- जयप्रकाश
h0w about the fire safety of the school buildings? this issue is currently being debated before the the mumbai high court, Goa bench and two reputed school buildings in the capital city are found to be allegedly violating the fire safety norms prescribed by the directorate of fire safety. These buildings are a threat to the occupants.
..त्यांना हवा मोकळा श्वास..
चार भिंतींच्या आत घुसमटलेल्या मुलांना मैदानावरचा मोकळा श्वास मिळायला हवा. पण पणजी सारख्या शहरात पाहिले तर फक्त शाळेच्या इमारती उभ्या आहेत, मुलांना खेळण्यासाठी मोकळे असे मैदान नाही. त्यामुळे पणजीतील शाळांतील शारीरिक शिक्षक मुलांना खेळाचे धडे कसे देणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. मुलांना दमछाक करणारा व्यायाम हवा, तरच मुलांचे आरोग्य सुदृढ राहील. त्यासाठी स्वतंत्र शैक्षणिक संकुल असणे, आजची गरज आहे.
what should i say about this forum. its amazing, to start communication wid the residents of goa with the help of media.
keep on..
thats it
Post a Comment